
कोरोना विषाणूच्या (COVID-19) वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून आज सर्व राज्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्देश जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार १० वर्षांखालील लहान मुले आणि ६५ वर्षांवरील वृद्धांना घरातून बाहेर अजिबात पडू न देण्याच्या कठोर नियमांची अंमलबजावणी होईल. या नियमातून केवळ लोकप्रतिनिधी, सरकारी कर्मचारी आणि डॉक्टरांना वगळण्यात आले आहे. तसेच २२ मार्चपासून सर्व आंतरराष्ट्रीय विमानांना भारतात येण्यास बंदी घालण्यात येणार असल्याचीही माहिती समोर आली आहे. एका आठवड्यासाठी ही बंदी लागू असेल.
परदेशातून आलेल्या प्रवाशांमुळे भारतात करोना व्हायरसचा फैलाव झाला आहे. करोना व्हायरसचे सध्या देशभरात १५० पेक्षा जास्त रुग्ण असून आतापर्यंत चौघांचा मृत्यू झाला आहे.खासगी क्षेत्रातील कर्मचार्यांना घरूनच कामाची सुविधा मिळावी, अशी विनंती केंद्र सरकारने राज्यांना केली आहे. आपत्कालीन आणि अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात यावी. गर्दी जमण्यापासून रोखण्यासाठी केंद्र सरकारच्या ग्रुप बी आणि ग्रुप सी प्रवर्गातील कर्मचार्यांना पर्यायी आठवड्यात कार्यालयात येण्यास सांगितले आहे.
दरम्यान देशभरात मॉल, सिनेमागृहे, किमान ८५ रेल्वेगाड्या आदी गर्दीची ठिकाणे बंद आहेत. देशातील अनेक राज्यांत भीतीचे वातावरण व अघोषित जमावबंदीसारखी परिस्थिती असताना रोज सुमारे २००० लोक ज्या निमित्ताने एका ठिकाणी येतात ते संसद अधिवेशन गुंडाळण्याची सरकारची बिलकूल तयारी नाही. राज्यसभेत आज सलग दुसऱ्या दिवशी कॉंग्रेससह विरोधी सदस्यांनी कोरोनाच्या संक्रमणामुळे अधिवेशन गुंडाळण्याची मागणी केली.