
२०१९ वर्षात भारतात अनेक क्रांतिकारी तसेच ऐतिहासिक घटना घडल्या. त्यापैकीच एक म्हणजे काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणाऱ्या कलम ३७० चे रद्दीकरण. ५ ऑगस्ट २०१९ रोजी कलम ३७० रद्द करण्यात आले व जम्मू काश्मीरला संघशासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आले. या निर्णयामुळे बरेच लोक नाराज होते व त्यामुळे काश्मीरमध्ये हिंसक आंदोलने होत होती. हा हिंसाचार थांबावा म्हणून काश्मीरमधील काही भागात जमावबंदी लागू करण्यात आली होती तसेच इंटरनेट व एसएमएस सेवा देखील बंद होत्या.
आज दिनांक १ जानेवारी २०२० ला तब्बल पाच महिन्यांनंतर काश्मीरमध्ये मोबाईल एसएमएस सेवा व सरकारी रुग्णालयांमध्ये ब्रॉडबँड सेवा पुन्हा चालू करण्यात आल्या आहेत. याशिवाय शाळा कॉलेजांमधील इंटरनेट सेवाही सुरू करण्यात आली. राज्य सरकारचे प्रवक्ते रोहित कंसल यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून काश्मीर परिसरात मोबाईल एसएमएस सुविधा व सर्व रुग्णालयांमध्ये इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली’ असे सांगितले. या रुपात काश्मीरला नवीन वर्षाचे गिफ्ट मिळाले आहे.
दहशतवादी कारवाया आणि हिंसाचार थांबावा म्हणून काश्मीरमध्ये आतापर्यंत १८० वेळा इंटरनेट बंद करण्यात आले आहे.