
कोरोना व्हायरसने देशभरात थैमान घातलेले असल्यामुळे केंद्र सरकारने लॉकडाऊनमध्ये दोन आठवड्यांची वाढ केली आहे. त्यामुळे तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन हा 3 मे पासून 17मे पर्यंत वाढविण्यात आला आहे.
देशभरात लॉकडाऊन वाढविण्यात आला असला तरी रेड झोन, ऑरेंज झोन व ग्रीन झोनमधील नागरिकांना काही सवलती देण्यात आल्या आहेत. ‘ग्रीन झोनमधील नागरिकांना जिल्ह्याअंतर्गत प्रवासाला परवानगी देण्यात आली आहे. मात्र जिल्ह्याबाहेर प्रवास करता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सार्वजनिक वाहनांमधील प्रवासी क्षमता ही ५० टक्क्यांवर आणण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
औषधे, वैद्यकीय साहित्य, जीवनावश्यक वस्तू,अन्नधान्य, पाणी यांचा पुरवठा करणाऱ्या ट्रक, टेम्पो आणि टँकरसाठी स्वतंत्र पासची आवश्यकता नाही. चालक वाहनाशी संबंधित कागदपत्रे, चालक परवाना आणि मालाची माहिती देणारी कागदपत्रे घेऊन प्रवास करत असेल तर त्याला स्वतंत्र परवान्याची आवश्यकता नाही. मात्र वाहन चालवणाऱ्याने सार्वजनिक ठिकाणी वावरत असल्याचे भान ठेवून नाक-तोंड मास्कने झाकून घेणे आवश्यक आहे, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने जाहीर केले आहे. काही राज्यांमध्ये ट्रक-टेम्पो चालकांसाठी स्वतंत्र पास दिले जात होते. या पासवरुन गोंधळ होऊ नये म्हणून केंद्रीय गृह मंत्रालयाने नव्याने राज्यांना सूचना दिल्या आहेत. राज्यांनी स्थानिक पातळीवर नियोजन करुन जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणारी वाहने कोणत्या जिल्ह्यात कोणत्या ठिकाणापर्यंत जाऊ शकतात, हे ठरवावे तसेच मालवाहतुकीतून कोरोनाचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी, अशा सूचनाही केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्य सरकारांना दिल्या आहेत.