Home राष्ट्रीय उरी पेक्षाही मोठा पुलवामा येथे दहशतवादी हल्ला;40 जवान शहीद.

उरी पेक्षाही मोठा पुलवामा येथे दहशतवादी हल्ला;40 जवान शहीद.

0

प्राईम नेटवर्क : जम्मू काश्मीर पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्यानं हादरलं आहे. यावेळी दहशतवाद्यांनी बसमधून जाणाऱ्या सुरक्षा जवानांना लक्ष्य केलं आहे. या बसमधून 42 जवान प्रवास करत होते.पुलवामातल्या अवंतीपुरातल्या गोरीपोरा भागात सुरक्षा जवानांच्या ताफ्यावर जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला.

जम्मू महामार्गावरील पुलवामा जिल्ह्यातील अवंतिपुरा भागात दहशतवाद्यांनी केलेल्या आयईडी स्फोटात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे 40 जवान शहीद झाले आहेत;तर सीआरपीएफचे 35हून अधिक जवान जखमी आहेत. हा हल्ला सप्टेंबर २०१६ मध्ये उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यापेक्षा मोठा आहे. त्यावेळी दहशतवाद्यांनी राष्ट्रीय रायफल्सच्या तळावर हल्ला केला होता. त्यात ३० जवान शहीद झाले होते.

त्यानंतर एप्रिल 2017मध्ये कुपवाड्यातील पंजगाममध्ये सेनेच्या लष्करी कॅम्पवर हल्ला करण्यात आला होता. जून 2017 ला बांदीपोऱ्यातील संबळमधील सीआरपीएफच्या कॅम्पवर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात लष्करानं चार दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.ऑगस्ट 2017ला पुलवाम्यातील पोलीस लाइनमध्येही दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात 8 जवान शहीद झाले होते. तर 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आलं होतं. 10-11 फेब्रुवारी 2018लाही सुंजवा इथल्या लष्कराच्या तळावर हल्ला झाला होता,ज्यात 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता, तर 6 जवान शहीद झाले होते. २०१९ मध्ये आतापर्यंत 28 दहशतवादी मारले गेलेत.

पुलवामा येथे याआधीही हल्ले झाले आहेत. एक वर्षापूर्वी १५ फेब्रुवारी २०१८ रोजी दहशतवाद्यांनी पुलवामा येथील पंजगाम जवळील केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या तळावर हल्ला केला होता. यावेळी दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या तळावर घुसण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, जवानांच्या सतर्कतेमुळे हा हल्ला निष्फळ ठरला.

उरी हल्ल्यानंतर भारतीन सैन्याने बदल्याची कारवाई करत पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवादी तळावर सर्जिकल स्ट्राईक केले. या हल्ल्यात सीमेपलीकडून प्रशिक्षीत दहशतवाद्यांचा समावेश असल्याची माहिती पुढे येत आहे. त्यात लोकसभा निवडणूक तोंडावर असताना हा हल्ला झाल्याने पाकिस्तान स्थित दहशतवादी तळावर कारवाई करण्याचा दबाव सरकारवर राहणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीव्र शब्दात या हल्ल्याचा निषेध केला आहे. या हल्ल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. तर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह उद्या श्रीनगर दौर्‍यावर जाणार आहेत.