
दिल्ली येथे डिसेंबर २०१२ मध्ये घडलेले निर्भया बलात्कार प्रकरण आपल्याला चांगलेच ठाऊक आहे. ही घटना घडली तेव्हा निर्भयासोबत असलेला मित्र अवनींद्र पांडे हा या घटनेचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होता. आज त्याच्याबद्दल एक धक्कादायक बाब समोर आली आहे. ज्येष्ठ पत्रकार अजित अंजुम यांनी काल केलेल्या १० ट्विट्स वरून असे लक्षात आले की निर्भयाचा तो मित्र मुलाखत देण्यासाठी न्यूज चॅनल्सकडून खूप मोठी रक्कम घ्यायचा. या बातमीमुळे देशभरात संताप व्यक्त केला जात आहे.
अजित अंजुम यांच्या ट्विट नुसार काही दिवसांपूर्वी न्यूज २४ या वृत्तवाहिनीवर त्याला मुलाखतीसाठी बोलावले असता त्याने एक लाख रुपयांची मागणी केली होती. पण बोलणी करून त्याला ७०,००० रूपये दिले जातील असे ठरवण्यात आले होते. ही गोष्ट त्यांना सर्वांसमोर आणायची होती. त्यासाठी मुलाखतीआधी पैसे घेतांना त्याचे स्टिंग ऑपरेशन करण्यात आले होते. मात्र तेव्हाच हे उघड केले असते तर आरोपींच्या वकिलांनी याचा आधार घेऊन आरोपींना सोडवले असते असेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे. या गोष्टीमुळे देशभरात सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे तसेच ही घटना उघड केल्याबद्दल अजित अंजुम यांचे कौतुकही केले जात आहे.
