Home आरोग्य परराज्यातील मजुरांची फिटनेस सर्टिफिकेट साठी खासगी दवाखान्यांमध्ये तुफान गर्दी

परराज्यातील मजुरांची फिटनेस सर्टिफिकेट साठी खासगी दवाखान्यांमध्ये तुफान गर्दी

0

राज्यातील हजारो परप्रांतीय कामगारांनी सोमवारपर्यंत आपल्या राज्यांत परतण्यासाठी राज्य सरकारकडे अर्ज केले आहेत. केंद्र सरकारकडून कामगारांसाठी आपल्या राज्यात परतण्यासाठी ‘मानक प्रक्रिया प्रणाली’ (एसओपी) तयार करण्यात आली असून येत्या दोन दिवसांत या कामगारांना घेऊन जाणाऱ्या खास ट्रेन सोडण्यात येणार आहेत. परंतु या ट्रेन्स मध्ये प्रवास करण्यासाठी आरोग्य तपासणी दाखला अत्यंत आवश्यक आहे.

सरकारी कार्यालयात परतीसाठी नोंद केलेल्या कामगारांना जर स्वत:च्या अथवा खासगी गाडीने आपल्या राज्यात परतायचे असेल तर त्यांना उपजिल्हाधिकारी अथवा पंचायत पातळीवरून ‘ट्रान्सिट पास’ घ्यावा लागणार आहे. हा ट्रान्सिट पास मिळवण्यासाठी कामगारांना त्यांचे आरोग्य ठणठणीत असल्याचा पुरावा दाखल करणे बंधनकारक आहे, याच कारणामुळे राज्यातील विविध भागात अडकलेल्या परप्रांतीय मजुरांनी खासगी दवाखान्यांमध्ये तुफान गर्दी केली आहे. काल दारूच्या दुकानांसमोरील गर्दी आणि आज ही हॉस्पिटल्स समोरील झालेली गर्दी ही कोरोनासाठी सुरक्षित अंतर या अत्यावश्यक बाबीची पायमल्ली आहे.

दरम्यान दोन राज्यांमध्ये रेल्वेतून कामगारांचे स्थलांतर व्हावे, यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून प्रयत्न सुरू आहेत. सदर रेल्वे एका स्थानकाहून थेट दुसर्‍या स्थानकापर्यंत धावणार असून वाटेत कुठेही थांबा घेणार नाही. रेल्वे मंत्रालयाकडून सदर रेल्वेबाबत वेळापत्रक व दिवस निश्‍चित केला जाणार नाही, तोपर्यंत रेल्वेची माहिती उघड केली जाणार नाही.