Home राष्ट्रीय पुलवामा अटॅक : गृहमंत्रालयाच्या उच्च अधिकाऱ्यांची एक विशेष बैठक.

पुलवामा अटॅक : गृहमंत्रालयाच्या उच्च अधिकाऱ्यांची एक विशेष बैठक.

0

प्राईम नेटवर्क : पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमिवर गृहमंत्रालयाच्या उच्च अधिकाऱ्यांची एक विशेष बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीत देशाच्या विविध शहरातील सुरक्षा व्यवस्था तसेच सीमा भागांमधील हालचालीवर माहिती देण्यात येईल असे कळते आहे. तसेच पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादा विरोधात कडक कारवाई करण्यासाठी देशातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात येत असल्याची चर्चा आहे. दरम्यान, पुलवामाजवळच पिंगलान भागात आज दोन दहशतवाद्द्यांचा खातमा करण्यात यश आले आहे.

या चकमकीत हिंदुस्थानच्या एका मेजरसह चार जवान शहीद झाले आहेत. चकमकीत ठार केलेले दोन अतिरेकी हे जैश-ए- मोहम्मद या अतिरेकी संघटनेचे कमांडर असल्याची माहीत मिळत आहे. ज्या दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले त्यात मास्टरमाईंड गाजी अब्दुल रशीद आणि जैश-ए-मोहम्मदचा कमांडर कामरान असण्याची शक्यता आहे. मात्र अद्याप त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याने अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

दहशतवाद्यांनी केलेल्या पुलवामा हल्ल्यात 40 जवान शहीद झाल्यानंतर देशात एक आक्रोश निर्माण झाला आहे. दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी हिंदुस्थानच्या सरकारने कडक पाऊले उचलावी अशी मागणी करण्यात येत असून ठिकठिकाणी बंद, सह्यांची मोहीम, शांतता मोर्चे काढण्यात येत आहेत.