
रिलायन्स जिओ आणि फेसबुक या दोन कंपन्यांनी परस्पर सहकार्याचा करार नुकताच केला आहे. त्याद्वारे फेसबुकच्या व्हॉट्सऍप द्वारे रिलायन्सच्या स्थानिक किराणा स्टोअर्सवरून आता सर्व लोकांना घरात बसल्या बसल्या किराणा व अन्य जीवनावश्यक मालाचा पुरवठा केला जाणार आहे. दोन्ही कंपन्यांमधील हा करार ₹ ४३ हजार ५७४ कोटी रूपयांचा आहे. फेसबुकनेही आपण रिलायन्स जिओशी हा ५.७ अब्ज डॉलर्सचा करार करीत असल्याची माहिती दिली आहे. त्यात फेसबुक रिलायन्स जिओचे ९.९९ टक्के शेअर्स विकत घेणार आहे.
याबाबतीत मुकेश अंबानी यांनी म्हटले आहे की, जिओची जागतिक दर्जाची डिजीटल कनेक्टीव्हीटी आणि फेसबुकचे भारतीय नागरीकांशी असलेले नाते या दोन्ही शक्ती एकत्र येऊन आता तुमच्या प्रत्येकाला नवीन सेवा देण्यास सज्ज झाले आहेत.
जिओ कंपनी तर्फे जिओ मार्ट हा नवीन उपक्रम सुरू आहे आणि त्याद्वारे सुमारे ३ कोटी छोट्या किराणा दुकानांना डिजीटल व्यवहाराशी जोडून भारतातील प्रत्येक नागरीकाला व्हॉट्सऍपवर ही सुविधा सेवा पुरवली जाणार आहे. याचा अर्थ व्हॉट्सऍपवरून आता आपण आपल्या गरजेच्या मालाची झटपट ऑर्डर देऊ शकता आणि त्याची झटपट डिलिव्हरीही आपल्या दारात मिळवू शकता. या सेवेचा लाभ घेऊन छोट्या किराणा दुकानदारांनाही आपला व्यवसाय वाढवण्याची संधी मिळणार असून त्यांनाहीं नवीन ग्राहक सहज मिळू शकणार आहेत.
सध्या फेसबुकच्या व्हॉट्सऍप सेवेने चाळीस कोटी भारतीय जोडले गेले आहेत. त्यांना आता जिओची साथ मिळाल्यानंतर भारतातील शेतकरी, छोटे व मध्यम व्यावसायिक, विद्यार्थी, शिक्षक, आरोग्य सेवक, महिला आणि युवक यासर्वांनाच याच लाभ होणार आहे असे मुकेश अंबानी यांनी म्हटले आहे. आम्ही दोन्ही कंपन्या भारताची डिजीटल इकॉनॉमि आधिक मजबूत करणार आहोत असेही त्यांनी म्हटले आहे.