प्राईम नेटवर्क : पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला स्पष्ट शब्दांमध्ये इशारा दिला आहे. यानंतर आता सीआरपीएफनं मोजक्याच मात्र तीव्र शब्दांमध्ये या घटनेचा निषेध नोंदवला आहे. आम्ही हा हल्ला विसरणार नाही आणि हल्लेखोरांना कधीही माफ करणार नाही, अशा शब्दांमध्ये सीआरपीएफनं हल्लेखोरांना सूचक इशारा दिला आहे. सीआरपीएफनं ट्विट करुन हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे.
मोदींच्या कठोर प्रतिक्रियेनंतर आता सीआरपीएफनं शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करत एक ट्विट केलं आहे. ‘आम्ही विसरणार नाही, आम्ही माफही करणार नाही’ असं या ट्विटमध्ये सीआरपीएफनं म्हटलं आहे. ‘पुलवामा हल्ल्यातील शहिदांना आम्ही वंदन करतो. आम्ही आमच्या शहीद भावंडांच्या कुटुंबांसोबत आहोत. या भ्याड हल्ल्याचा बदला घेऊ,’ असं ट्विट त्यांनी केलं आहे
दहशतवादीहल्ल्यानंतर मोदी सरकारनं हालचाली सुरू केल्या आहेत. पाकिस्तानला देण्यात आलेला मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा रद्द करण्यात आला आहे. पाकिस्तानची आर्थिक नाकेबंदी करण्याच्या दृष्टीनं हे पाऊल उचलण्यात आलं. सुरक्षा समितीच्या बैठकीनंतर पंतप्रधानांनी तीव्र शब्दांमध्ये दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत पाकिस्तानला स्पष्ट शब्दांमध्ये इशारा दिला आहे.दहशतवाद्यांना थेट आणि स्पष्ट इशारा देणारं सीआरपीएफचं “हाय जोश” वाल हे ट्विट महत्त्वपूर्ण मानलं जात आहे.