
प्राईम नेटवर्क : जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा येथे गुरुवारी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात ४४ जवान शहीद झाले. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. दरम्यान,पुलवामामध्ये दहशतवादी हल्ल्याआधी पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांनी अनेक रॅली घेतल्या होत्या. ५ फेब्रुवारी रोजी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या झालेल्या एका रॅलीमध्ये भारतावर हल्ल्याची धमकी देण्यात आली होती,असे सूत्रांकडून समजले आहे.
जैश-ए-मोहम्मदच्या कराची येथील रॅलीमध्ये संसद हल्ल्याचा मास्टरमाइंड अफजल गुरूच्या नावाखाली आत्मघाती हल्लेखोरांचं पथक बनवण्याची घोषणा केली होती. आत्मघाती हल्लेखोरांची सात पथकं भारताच्या विविध शहरांमध्ये रवाना झाली आहेत अशी घोषणा या रॅलीमध्ये करण्यात आली होती. याशिवाय रॅलीदरम्यान दहशतवादी हाफिज सईदने पंतप्रधान मोदींच्या नावाने धमकी देत, ‘मोदी तुमची फौज घेऊन काश्मीरमधून परत जा असा इशारा दिला होता. जर फौज घेऊन काश्मीरमधून गेला नाहीत तर बरंच काही गमवावं लागेल’ अशी धमकी सईदने दिली होती.
दरम्यान, भ्याड आत्मघाती दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षेविषयी शुक्रवारी सकाळी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची तातडीची बैठक बोलावली आहे. शुक्रवारी सकाळी सव्वा नऊ वाजता सुरू होणाऱ्या या बैठकीत महत्त्वाचा निर्णय होण्याची अपेक्षा आहे. याशिवाय हल्ल्याच्या चौकशीसाठी एनआयएच्या 12 सदस्यांचं पथक देखील विशेष विमानाने घटनास्थळी पोहोचणार आहे.