
कोरोना संकट महामारीच्या काळात सर्वांची परिस्थिती बिकट आहे. अत्यावश्यक सेवा तसेच इतर गोष्टींच्या पुरवठ्यावर लॉकडाऊन मूळे बराच मोठा परिणाम झाला आहे. अशातच अनेक लोक समोर येत, समाजातील गरजूंसाठी गोष्टींचे मोफत वितरण करत आहेत.
मुंबईच्या कुलाबा भागात आमदार मंत्री आदित्य ठाकरे यांनी मोफत सॅनिटरी पॅड वाटप सुरू केले होते. या उपक्रमात मात्र सॅनिटरी पॅड च्या पाकिटांवर आदित्य ठाकरे यांचा फोटो असल्यामुळे संताप व्यक्त होत आहे.शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांकडून हे वाटप करण्यात आलं आहे. त्यामुळे अशी परिस्थिती असताना जाहीरातबाजी करण्याची गरज आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
मनसेचे कार्यकर्ते संदीप देशपांडे यांनी आदित्य ठाकरेंच्या या कृत्याचा फोटो ट्विटर वर टाकून खडा सवाल केला आहे, ” कशावर कुणाचा फोटो टाकायचा हे कळत नाही का नालायकानो? आता म्हणाल राजकारण करू नका!” असे ते म्हणाले.
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरजूंना मदत देताना फोटो व व्हिडिओच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी केली जात आहेत. यावर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मदत करताना फोटो न काढण्याचे आवाहन केले होते. कॅमेऱ्याकडं बघून मदतकार्याची छायाचित्रं काढणं, मदत स्वीकारणाऱ्यास कॅमेऱ्यात बघण्यास सांगणं अशा चुकीच्या गोष्टी काही लोक करत आहेत.