
प्राईम नेटवर्क : देशभरात सध्या आगामी लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर दिल्लीत बुधवारी (ता.१३) मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विरोधकांच्या सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.
दिल्लीत बुधवारी अरविंद केजरीवाल यांनी विरोधकांच्या सभेतून भाजपा आणि मोदींवर टीकास्त्र सोडले. केजरीवाल यांनी मोदींच्या शैक्षणिक पात्रतेवरही प्रश्न उपस्थित केले..ते म्हणाले, ‘‘गेल्यावेळी तुम्ही बारावी पास व्यक्तीला पंतप्रधान म्हणून निवडले. आता या चुकीची पुनरावृत्ती करु नका. यावेळी एखाद्या सुशिक्षित व्यक्तीस पंतप्रधानपदी संधी द्या. पंतप्रधानपद अत्यंत महत्त्वाचे पद आहे. बारावी पास व्यक्तीला हस्ताक्षर कुठे करायचे हेच समजत नाही.’’
‘‘मोदी सरकारच्या काळातील राफेल करारात विमानांसाठी जास्त पैसे द्यावे लागले. यासाठी मोदीच जबाबदार आहेत. देशाच्या पंतप्रधानांनी एखाद्या विमान कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करणे कितपत योग्य आहे, असा सवालही केजरीवाल यांनी यावेळी उपस्थित केला. शिवाय राफेल करारातील सत्य बाहेर आल्यास मोदींना राजीनामा द्यावा लागेल.” असेही मतही त्यांनी व्यक्त केले.
दिल्लीत पार पडलेल्या या सभेत ममता बॅनर्जी, शरद पवार, चंद्राबाबू नायडू आदी नेते उपस्थित होते. केजरीवाल पुढे म्हणाले, १४ एप्रिल २०११ रोजी जंतर मंतरवरील ऐतिहासिक भ्रष्टाचारविरोधी आंदोलनानंतर देशातील जनतेने तत्कालीन यूपीए सरकारला सत्तेतून हटवले होते. त्याच पद्धदतीने आता या सभेनंतर जनता मोदी सरकारला उखाडून फेकणार, असे त्यांनी सांगितले.केजरीवालांनी भाषणात ममता बॅनर्जींचेही कौतुक केले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ज्या पद्धतीने सीबीआयच्या कारवाईवरुन टक्कर दिली ते कौतुकास्पदच आहे,असे ते म्हणाले.