
प्राईम नेटवर्क: निवडणूक तोंडावर आली तरी, युतीचे घोडे चर्चेच्या फडातच अडले आहे.शिवसेनेची एकही मागणी मान्य करायला भाजपाची तयारी नाही, तर दुसरीकडे भाजपासोबत घरोबा करण्याचे ठोस कारण सापडत नसल्याने शिवसेनाही पुढचं पाऊल उचलत नाही आहे. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीला युतीचा ‘ब्रेकअप डे’ असण्याची शक्यता नाकारता नाही येणार.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकमेकांच्या संपर्कात आहेत,तर दुसरीकडे भाजपा-शिवसेनेचे दोन वरिष्ठ मंत्री हे युतीसाठीची चर्चा करीत आहेत. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर हे भाजपा केंद्रीय नेतृत्वाच्या वतीने चर्चेत सहभागी होत आहेत.
युती करण्यासाठी शिवसेनेने तीन अटी ठेवल्या आहेत. त्यात पालघरची जागा शिवसेनेला द्यावी तसेच लोकसभेबरोबरच विधानसभेच्या जागांचेही वाटप व्हावे. दुसरी अट,शिवसेनेला हवा असलेला एखादा मोठा धोरणात्मक निर्णय सरकारने घ्यावा आणि तिसरी अट म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा अमित शहा यांच्यापैकी एकाने मातोश्रीवर येऊन शिवसेनेची मनधरणी करावी, या अटींचा समावेश आहे. मात्र, यापैकी एकाही अटीला अद्याप भाजपाकडून हिरवा कंदील मिळालेला नाही.
युतीला अंतिम स्वरुप देण्यात आले असून त्यात भाजपाला लोकसभेच्या २५ व शिवसेनेला २३ जागा, तर विधानसभेच्या १४५ जागा भाजपा तर १४३ जागा शिवसेना लढणार असल्याची चर्चा होती. मात्र दोन्ही बाजूंकडून या वृत्ताला दुजोरा मिळाला नाही. पालघरची जागा सोडण्यास भाजप तयार नाही. मात्र,मोदी किंवा शहा यांच्यापैकी एक जण येत्या काही दिवसांत मातोश्रीवर जाऊन युतीसाठी शिवसेनेचा हात मागणार असल्याची चर्चा आहे.