दोन दिवसांअगोदर उत्तर प्रदेश राज्यामधील बुलंदशहरमध्ये दोन साधूंची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेचा निषेध करत शिवसेनेनं कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी त्यांना तुम्ही महाराष्ट्राची चिंता करा उत्तर प्रदेशची चिंता नको असं सुनावलं होतं. तसंच पालघरमधील घटनेनंतर विरोधी पक्षानंही सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला होता. यावरून आता शिवसेनेनं टीका केली आहे. “भाजपशासित राज्यात भगवी वस्त्र रक्ताने लथपथ झाली तरी चिंतेची शिंक सुदधा कुणी मारायची नाही,” असं म्हणत शिवसेनेनं विरोधकांवर निशाणा साधला आहे.
सामनाच्या अग्रलेखात पुढील प्रमाणे टीका करण्यात आली, “योगांच्या राज्यात साधूंना गळे चिरून मारले. या साधूंच्या हत्येवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी योगी महाराजांना फोन केला व चिंता व्यक्त केली”.
“बुलंदशहरातील घटना वेगळी व महाराष्ट्रातील वेगळी, तुम्ही तुमचा महाराष्ट्र सांभाळा वगैरे विधाने योगी महाराजांच्या कार्यालयातून केल्याचे स्पष्ट दिसत आहे. म्हणजे महाराष्ट्रात एखादी दुर्घटना घडली की, चिंतेचा माहोल निर्माण केला जातो किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उभा केला जातो, पण भाजपशासित राज्यात भगवी वस्त्र रक्ताने लथपथ झाली तरी चिंतेची शिंकही कुणी मारायची नाही. भगव्या-भगव्यात व रक्ता-रक्तात फरक करणारे हे मानवी मन गमतीचेच आहे”, असं शिवसेनेनं म्हटलं आहे. शिवसेनेनं सामनाच्या संपादकीयमधून याप्रकरणावर टीका केली आहे.
पालघर साधू हत्येचे आरोपी पकडले गेले तसे उत्तर प्रदेशातील बुलंदशहरात झालेल्या साधू हत्याकांडाचे आरोपीदेखील अटकेत गेले. कारण दोन्ही राज्ये कायद्याची आहेत. फरक इतकाच की, महाराष्ट्रात विरोधी पक्ष जसा थयथयाट करीत आहे तसे चित्र योगी महाराजांच्या राज्यात दिसत नाही. राजकारणातील मानवी मनाचे हे नवे कंगोरे गमतीचे तितकेच गुंतागुंतीचेही आहेत. जनता गंमत बघत आहे. महाराष्ट्रात विरोधी पक्ष गुंत्यात पाय अडकवून स्वत:चेच हसे करून घेत आहे. उत्तर प्रदेशची जनता या खेळास मुकली आहे. बाकी योगी महाराजांचे बरे चालले आहे.