Home खेळ स्पर्धा ऑस्ट्रेलिया धोनी सारख्या फिनिशरच्या शोधात!

ऑस्ट्रेलिया धोनी सारख्या फिनिशरच्या शोधात!

0

“आमचा संघ महेंद्रसिंग धोनी सारख्या फिनिशरच्या शोधात आहे”, असे वक्तव्य ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी केले. भारताचा माजी कर्णधार धोनी मागील वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषका नंतर क्रिकेट खेळलेला नाही. मात्र, त्याआधी १० ते १५ वर्षे धोनीने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. विशेषकरून शेवटच्या षटकांत फटकेबाजी करुन त्याने अनेकदा भारतीय संघाला विजय मिळवून दिला. त्यामुळे धोनी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम फिनिशर्सपैकी एक म्हणून ओळखला जातो.

ऑस्ट्रेलियाकडे पूर्वी माईक हसी, मायकल बेवनसारखे आक्रमक फलंदाज होते,ते फिनिशरची भूमिका अगदी चोखपणे पार पाडायचे. एमएस धोनीने भारतासाठी फिनिशर म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली आहे.जगातील प्रत्येक संघ त्याच्यासारख्या फिनिशरच्या शोधात असतो, असे लँगर यांनी नमूद केले. धोनीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाचव्या क्रमांकावर खेळत असताना ८३ सामन्यांत ५०.३० रन्स च्या सरासरीने ३१६९ धावा, तर सहाव्या क्रमांकावर खेळताना १२९ सामन्यांमध्ये ४७.३१ च्या सरासरीने ४१६४ धावा केल्या. धोनीचा समावेश असलेल्या संघाने आत्तापर्यंत २०५ एकदिवसीय सामने जिंकले, ज्यात त्याने ६९.०० च्या सरासरीने ६४८६ धावा केल्या.

मात्र धोनीच्या पुनरागमनाचे संकेत काहीसे धूसर दिसत आहेत. महेंद्रसिंग धोनीने आगामी आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली, तरच त्याचे भारतीय संघात पुनरागमन शक्य आहे, असे भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री काही महिन्यांपूर्वी म्हणाले होते. आता बीसीसीआयकडून याला दुजोरा मिळत असल्याचे समजते.