
जगभरामध्ये सध्या कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. त्यामुळे जवळजवळ सर्व प्रकारच्या क्रीडास्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत किंवा स्थगित सुध्दा करण्यात आल्या आहेत. भारतात होणारी क्रिकेटची सर्वात मोठी लीग आयपीएल ही देखील १५ एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आल्याची घोषणा झाली होती. त्यातच कोरोनाचा धोका भारतातही वेगाने वाढत आहे. त्यामुळे आता ही परिस्थिती पाहता आयपीएल एप्रिल-मेमध्ये होण्याची शक्यता धुसरचं आहे.
काही मीडिया रिपोर्ट्सच्या अनुसार आयपीएलचा यावर्षीचा कालावधी सुद्धा कमी केला जाऊ शकतो. पण टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार जर परिस्थिती लवकरात लवकर नियंत्रणात आली नाही तर संपूर्ण आयपीएलचा १३ वा मोसम जूलै-सप्टेंबरमध्ये घेण्याचा विचार बीसीसीआय करत आहे.
या कालावधीमध्ये आशिया चषक होणार आहे. तसेच इंग्लंड आणि पाकिस्तानमध्ये मालिका सुद्धा होणार आहेत. त्याचबरोबर भारताचा विचार केला तर भारताला सप्टेंबरमध्ये आशिया चषक खेळायचा आहे आणि श्रीलंका विरुद्ध भारताचे जून आणि जूलैमध्ये ३ वनडे आणि ३ टी२० सामन्यांच्या मालिका होणार आहेत. त्यामुळे आता या मालिकांचा विचार करुन बीसीसीआय आयपीएलचा मोसम जूलै-सप्टेंबरमध्ये आयोजित करणार का नाही हे लवकरचं कळेल!