Home खेळ स्पर्धा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची करामत, जिवंत खेळाडूला वाहिली श्रद्धांजली!

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची करामत, जिवंत खेळाडूला वाहिली श्रद्धांजली!

0

सोशल मीडियावर येणार्‍या बातम्यांची शहनिशा न करता लोक त्या व्हायरल करतात. नुकतेच पाकिस्तानचा 7 फूट 1 इंच उंची असलेला वेगवान गोलंदाज मोहम्मद इरफान जिवंत असतानाही त्याचे निधन झाल्याच्या बातम्या प्रचंड व्हायरल झाल्या. त्यानंतर त्याने आपण जिवंत असल्याची माहिती ट्विटरवर दिली.

पीसीबीने त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवर एका अन्य पाकिस्ताच्या मोहम्मद इरफान नावाच्या क्रिकेटपटूंच्या निधनानंतर शोक व्यक्त केला होता. परंतू लोकांना असे वाटले की, सात फूट एक इंच उंची असलेल्या मोहम्मद इरफानचेच निधन झाले आहे.

या अफवेमुळे मोहम्मद इरफानचे नातेवाईक, मित्र यांना चांगलाच धक्का बसला. या घटनेनंतर मोहम्मद इरफानने ट्विट करत आपण सुखरुप असल्याचे सांगितले.

त्याने ट्वीटमध्ये लिहिले की, “कार अपघातात माझे निधन झाल्याच्या बातम्या येत आहेत. माझा कसलाच अपघात झाला नाही. या अफवेमुळे माझ्या कुटुंबाला आणि मित्र परिवारास प्रचंड मानसिक त्रास झाला. मला सतत फोन येत आहेत. कृपया आपण अफवांपासून दूर राहा. मी सुरक्षित आहे.”

38 वर्षीय मोहम्मद इरफान याने इंग्लंडविरुद्ध 2010 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने पाकिस्तान संघाकडून एकूण 4 कसोटी, 60 वनडे आणि 22 टी 20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत 10, वनडेत 83 आणि टी20 मध्ये 16 बळी टिपले आहेत.

मार्च महिन्यात पाकिस्तान सुपर लीगमध्ये मोहम्मद इरफान हा मुलतान-सुलतानच्या संघाकडून खेळताना दिसून आला. या स्पर्धेत त्याने 4 बळी टिपले होते. मोहम्मद इरफान हा क्रिकेटमधला सर्वाधिक उंची लाभलेला क्रिकेटपटू आहे.