Home खेळ स्पर्धा बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूने घेतली निवृत्ती; पण नक्की कशातून?

बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूने घेतली निवृत्ती; पण नक्की कशातून?

0

काही वर्षांपूर्वी नावारूपाला आलेली भारताची एक उत्कृष्ट बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूने ‘मी निवृत्ती घेत आहे’ असे आपल्या ट्विटर व इंस्टाग्राम या सोशल मीडिया अकाउंट्सवर पोस्ट केले आहे. या पोस्ट मध्ये अगदी मोठ्या अक्षरांत ‘मी निवृत्त होत आहे’ असे लिहिले आहे. तसेच ‘डेन्मार्क ओपन ही माझी शेवटची स्पर्धा होती’ असेही या पोस्टमध्ये तिने लिहिले आहे. हे वाचून पहिल्यांदा अनेकांना धक्का बसला. केवळ २५ वर्ष वयाची खेळाडू इतक्या लवकर का निवृत्ती घेत आहे असा प्रश्न सर्वांना पडला.

मात्र ही पोस्ट पूर्णतः वाचल्यावर लक्षात येते की पी व्ही सिंधू बॅडमिंटनमधून निवृत्ती घेत नाहीये. आपल्या पोस्टमध्ये तिने पुढे लिहिले आहे की, ‘कोरोनामुळे निर्माण झालेल्या अस्वस्थ करणाऱ्या व नकारात्मक वातावरणातून मी निवृत्ती घेत आहे.’ तसेच यानंतरच्या आशिया ओपन स्पर्धेसाठी ती नव्या जोमाने पुन्हा एकदा बॅडमिंटन कोर्टवर उतरणार असल्याचेही तिने लिहिले आहे. एकंदरीत या पोस्टमधून तिने एक महत्वाचा व प्रेरणादायी विचार प्रकट केला आहे. सर्वांनीच पी व्ही सिंधूसारखा दृष्टिकोन ठेवून व योग्य ती काळजी घेऊन राहिले तर कोरोनाला हद्दपार करणे नक्कीच शक्य होईल.