
कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी देशामध्ये २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आणि आता अनेक राज्यांनी एप्रिल संपेपर्यंत वाढवली सुद्धा आहे. देशातल्या काही राज्यांनी हा लॉकडाऊन आणखी १५ दिवस म्हणजेच ३० एप्रिलपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊन वाढल्यामुळे आयपीएलच्या भवितव्यावरसुद्धा संकट ओढावलं आहे. बीसीसीआय अध्यक्ष आणि भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने आयपीएलच्या भविष्याबाबत मौन सोडलं आहे.
आयपीएलचा १३ वा हंगाम २९ मार्चपासून सुरू होणार होता, पण कोरोना व्हायरसमुळे ही स्पर्धा १५ एप्रिलच्या पुढे ढकलली गेली. भारतातली सध्याची परिस्थिती बघता १५ एप्रिलनंतर लगेच आयपीएल सुरू होणार नाही, हे जवळपास निश्चित आहे.
सौरव गांगुलीलादेखील याबाबतच प्रश्न विचारला गेला.
“आम्ही सध्या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहोत. सध्यातरी आम्ही काहीही सांगू शकत नाही. सध्या बोलण्यासारखं काहीच नाही. विमानतळं सुद्धा बंद आहेत. लोकं घरात बसलेली आहेत. ऑफिस बंद आहेत. कोणीच कुठेही जाऊ शकत नाही. मेच्या मध्यापर्यंत अशीच परिस्थिती कायम राहिल, असं वाटतंय,” अशी प्रतिक्रिया गांगुलीने दिली.
“जगभरात कोणत्याच क्रीडा स्पर्धा होत नाहीयेत. तुम्ही खेळाडू आणणार तरी कुठून? खेळाडू प्रवास कसा करणार? जगातल्या कोणत्याच क्रीडा स्पर्धेसाठी वातावरण पोषक नाही, आयपीएल तर विसरून जा. आयुष्यच थांबलंय, आयपीएलचं काय घेऊन बसलायत?”, असं वक्तव्य गांगुलीने केलं.
सोमवारी बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीनंतर गोष्टी स्पष्ट होतील. अधिकाऱ्यांसोबत बोलल्यानंतरच मी तुम्हाला याबाबत अधिकृत अधिक माहिती देऊ शकेन, असं गांगुली म्हणाला.