Home खेळ स्पर्धा VIDEO : टीम इंडियाच्या या पहिल्या मराठी सलामीवीर क्रिकेट पटू वर भिख...

VIDEO : टीम इंडियाच्या या पहिल्या मराठी सलामीवीर क्रिकेट पटू वर भिख मागण्याची वेळ का आली ?

0
first team india

प्राईम मराठी : जेव्हा भारतीय संघाने पहिल्यांदा १९३२ मध्ये लॉर्ड्स च्या मैदानावर इंग्लड विरोधात टेस्ट मॅच खेळली होती तेव्हा त्या मॅचच्या पहिल्या बॉलचा सामना करणारा ओपनर फलंदाज होता जनार्दन ज्ञानोबा नवले. ते भारतीय क्रिकेटमधील पहिले विकेट किपर होते. त्यांची बॅटिंग टेस्ट मॅच मध्ये जास्त चालली नाही त्यामुळे त्यांनी आयुष्यात दोनच टेस्ट मॅचेस खेळल्या आणि भारतीय क्रिकेट संघातून बाहेर पडल्यानंतर ते कधीच फिरून खेळाकडे परत येऊ शकले नाही. पुढील काळात जनार्दन यांना खूप दारिद्र्य सोसावं लागलं. एक वेळ अशी आली की त्यांना पुणे – मुंबई महामार्गावर भीक मागावी लागली व याच दयनीय परिस्थितीत त्यांचा मृत्यू झाला. फार काळ भारतीय क्रिकेट संघात खेळी न खेळल्यामुळे बरेच क्रिकेटप्रेमी जनार्दनला ओळखत नसतील पण त्या काळात त्यांच्या विकेट किपींग कौशल्याची स्वतः इंग्रजही स्तुती करायचे. जर तुम्ही एक क्रिकेटप्रेमी असाल तर तुम्हाला बेस्ट विकेट किपर जनार्दन ज्ञानोबा नवले यांच्यावर का भीक मागण्याची वेळ आली हे माहित असायला हवं.

०७ डिसेंबर १९०२ रोजी महाराष्ट्रातील फुलगाव या छोट्याश्या गावात जन्माला आलेले जनार्दन कमी शिकलेले असले तरी एक उत्तम विकेट किपर होते. टेस्ट मॅच मध्ये त्यांची फलंदाजी जरी उत्तम नसली तरी इतर मॅचेसमध्ये त्यांची खेळी उत्तम होती. त्यांनी पासष्ट मॅचेस मध्ये १ हजार नऊशे ७६ धावा काढल्या सोबतच एकशे एक कॅचेस सह छत्तीस स्टंपिंग घेतले. यावरून जनार्दन यांची उत्कृष्ट खेळी तुम्हाला लक्षात आलीच असेल. एका सामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्माला आलेल्या जनार्दन सारखा विकेट किपर दुसरा कुणी नव्हता. असही म्हटलं जातं की फास्ट गोलंदाजांचा त्यांच्या समोर टिकाव लागत नसे म्हणूनच इंग्लड विरोधात खेळल्या जाणाऱ्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये जनार्दन यांना प्रथम फलंदाजीची संधी देण्यात आली होती.

जनार्दन यांनी संपूर्ण क्रिकेट पर्वात २ टेस्ट मॅचेस खेळल्या. त्यापैकी दुसरी टेस्ट मॅच त्यांचं करियर त्यांच्या कडून हिसकावून घेऊन गेली. त्यांची खेळी उत्तम होती मात्र टेस्ट मॅच मध्ये त्यांची फलंदाजी हवी तशी चालत नव्हती म्हणून त्यांना भारतीय क्रिकेट संघातून बेदखल करण्यात आलं. यामुळे त्यांच्यावर संकटांचा जणू डोंगर कोसळला. तरी त्यांनी हार मानली नव्हती. त्यांनी क्रिकेट संघात परतण्याचे बरेच प्रयत्न केले मात्र प्रयत्नांना काही यश येत नाहीये हे पाहून दिवसें दिवस ते खचू लागले. बरेच लोक असेही म्हणतात की त्यांना ग्वालियर मध्ये नोकरी देण्यात आली होती, मात्र क्रिकेट पासून दूर गेल्या मुळे त्यांचे कामात लक्ष लागले नाही आणि ते पुण्याला म्हणजे आपल्या राहत्या घरी परत आले. क्रिकेटच्या विरहा नंतर परत घरी आल्यावर जनार्दन यांनी एका साखर कारखान्यात सिक्युरिटी गार्डची नोकरी केली. वेळे नुसार त्यांचे क्रिकेटर मित्रांशी संपर्क विरळ होत गेले, पैशांची ही चणचण जाणवायला लागली होती. सिक्युरिटी गार्डच्या नोकरीतून मिळणाऱ्या पगारात कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नव्हता. आता त्यांच्याकडे २ खोल्यांच्या फ्लॅट शिवाय काहीच शिल्लक राहीलं नव्हतं. अशा बिकट परिस्थितीत कसेबसे ते आपलं जीवन व्यतीत करत होते.

शेवटच्या दिवसांमध्ये त्यांची आर्थिक परिस्थिती खूपच खालावली होती. त्या काळात क्रिकेट बोर्डही निवृत्त किंवा कमकुवत खेळीमुळे काढलेल्या खेळाडूंची मदत करत नसे. आता प्रमाणे तेव्हा क्रिकेटमधून खूप काही कमाई होत नसे म्हणून त्यांच्याकडे काही बचतही नव्हती. त्यातल्या त्यात शिक्षणाच्या कमतरतेमुळे त्यांना काही कामही मिळत नव्हतं. जड कामासाठी वयानुसार शरीर साथ देत नव्हतं आणि म्हणून कदाचित त्यांना शेवटी भीक मागावी लागली. त्यांना शेवटचं पुणे – मुंबई हायवेवर भीक मागताना पाहण्यात आलं होतं. दुर्दैवाने याच परिस्थितीत १९८९ मध्ये त्यांची प्राणज्योत विझली आणि या पेक्षाही मोठं दुर्दैव म्हणजे एका उत्कृष्ट खेळाडूला शेवट पर्यंत एक चांगलं आयुष्य तर नाहीच लाभलं पण आज तो महान क्रिकेटर आपल्या आठवणीत ही जिवंत नाही.