Home तंत्रज्ञान मातृभाषा दिवसासाठी कोणताही दिवस साजरा होऊ शकतो; मग “21 फेब्रुवारी”च का ?

मातृभाषा दिवसासाठी कोणताही दिवस साजरा होऊ शकतो; मग “21 फेब्रुवारी”च का ?

0

प्राईम नेटवर्क : आज 21 फ्रेब्रुवारी म्हणजेच जागतिक मातृभाषा दिन. आपण आपल्या आईकडून जी भाषा पहिल्यांदा शिकतो आणि आपल्याला या जगाची पहिली ओळख करून देते ती भाषा म्हणजे मातृभाषा. खरंतर मातृभाषा दिवसासाठी कोणताही दिवस साजरा होऊ शकतो, पण तरीही 21 फेब्रुवारीच का याचं उत्तर इतिहासात सापडतं. याची सुरुवात झाली ती हिंदुस्थानच्या फाळणीपासून. पाकिस्तान सरकारने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात दिलेल्या लढ्याच्या स्मृतीला अभिवादन म्हणून हा दिवस युनेस्कोने निवडला आहे.

मानवाच्या उत्क्रांतीच्या टप्प्यापासून काळाच्या विविध टप्प्यांवर स्वतःची नागरी संस्कृती विकसित करताना भाषा ही त्याची एक ओळख बनली. म्हणूनच कदाचित भाषा हा मानवी उत्क्रांतीतला एक मैलाचा दगड आहे. हीच ओळख पुसण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला आणि मातृभाषेसाठीच्या आंदोलनाची ठिणगी पडली.

1947 मध्ये फाळणी झाली आणि अखंड हिंदुस्थानचे अजून दोन तुकडे वेगळे झाले. पहिला पाकिस्तानचा आणि दुसरा आताचा बांगलादेश व तेव्हाचा पूर्व पाकिस्तान. पाकिस्तानने स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा मिळताच राज्यकारभार सुरू केला आणि 1948 मध्ये कारभारासाठी उर्दू राष्ट्रभाषा म्हणून जाहीर केली.पण,त्यावेळचा पूर्व पाकिस्तान हा बहुतांश बंगाल प्रांताचा भाग असल्यामुळे तिथल्या नागरिकांना हा निर्णय आवडला नाही. कारण, त्यांची मातृभाषा बांगला होती. त्यामुळे त्यांनी पाकिस्तान सरकारकडे बांगला ही भाषाही राष्ट्रीय भाषांमध्ये समाविष्ट व्हावी अशी मागणी केली. मात्र, पाकिस्तानने ही मागणी फेटाळून लावली. त्यामुळे पूर्व पाकिस्तानात ठिकठिकाणी आंदोलनं करायला सुरुवात केली. वेगवेगळ्या सभांमधून बांगलासाठीची मागणी जोरदारपणे लावून धरण्यात आली

पाकिस्तानने नेहमी प्रमाणे अत्यंत क्रूरपणे हे आंदोलन दडपायला सुरुवात केली. बांगलाप्रेमींच्या सभा उधळून लावल्या. बांगलाप्रेमींना तुरुंगवास घडवले. पण,तरीही लोक मागे हटत नाहीत असं पाहून एक दिवस ढाका येथे सुरू असलेल्या रॅलीवर गोळीबार करण्यात आला. त्यात काहीजण मृत्युमुखी पडले आणि 100हून अधिक जण जखमी झाले. तो दिवस होता 21 फेब्रुवारी 1952.

आजवरच्या इतिहासातली ही अतिशय दुर्मीळ घटना आहे, जिथे मातृभाषेसाठी राष्ट्राच्या विरोधात प्रखरपणे विरोध करण्यात आला आणि लोकांनी आपलं रक्तही सांडलं. पण,चार वर्षांच्या लढ्यानंतर त्यांना यश आलं आणि त्यापुढे पाकिस्तान सरकार नमलं. 1956मध्ये बांगला या भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा देण्यात आला. तेव्हा पूर्व पाकिस्तानात 21 फेब्रुवारी हा दिवस भाषा आंदोलन दिवस म्हणून साजरा केला गेला.युनेस्कोलाही बांगला भाषाप्रेमींचा हा लढा खूप भावला.1999मध्ये अधिकृतरित्या हा दिन जाहीर झाला आणि 21 फेब्रुवारी 2000 रोजी पहिला जागतिक मातृभाषा दिन साजरा केला गेला.