Home आध्यात्मिक सर्वांची चिंता दूर करणाऱ्या अष्टविनायक चिंतामणी मंदिराची काय आहे कहाणी ?

सर्वांची चिंता दूर करणाऱ्या अष्टविनायक चिंतामणी मंदिराची काय आहे कहाणी ?

0
chintamani temple

गणेश आगमनाच्या शुभप्रसंगी आपण अष्टविनायक दर्शनाची सफर करीत आहोत. आज दुसऱ्या दिवसा निमित्त बघुयात अष्टविनायकांपैकी दुसरा गणपती थेऊरचा ‘श्री चिंतामणी’. चला तर मग पाहुयात गणपती बाप्पाचं नाव चिंतामणी का पडलं आणि काय आहे थेऊरच्या श्री चिंतामणी मंदिराची कहाणी.

राजा अभिजित आणि त्याची पत्नी गुणवंती त्यांना पुत्र संतान नसल्याने फार दुःखी होते. मग वैशंपायन नावाच्या ऋषीच्या आदेशावरून त्या दोघांनी वनात जाऊन तपश्चर्या केली. कालांतराने त्यांना एक पुत्र झाला ज्याचे नाव ‘गण’ असे ठेवण्यात आले. गण खुप पराक्रमी होता मात्र तो थोडा जास्तच रागीट होता. एकदा तो कपिल मुनींच्या आश्रमात गेला. कपिलांच्या जवळ चिंतामणी रत्न होते. त्या रत्नाच्या सामर्थ्याने कपिलमुनींनी गणाला पंचपक्वान्न दिले. गणाला चिंतामणी रत्नाचा मोह झाला आणि तो त्याने मुनींना बोलून ही दाखवला पण मुनींनी ते रत्न देण्यास शांतपणे नकार दिला. गण चिडला आणि त्याने चिंतामणी चक्क हिसकावून घेतला. कपिल मुनी नाराज झाले. त्यांनी दुर्गा देवीच्या आज्ञेवरून गणेशाची आराधना केली. बाप्पा प्रसन्न झाला व चिंतामणी रत्न परत मिळवून देण्याचे कपिल मुनींना वचन दिले.

यानंतर एक दिवस गण आणि बाप्पांचं मोठं युद्ध झालं. गणेशाने गण राजाचा वध करून कपिलमुनींचा चिंतामणी रत्न परत दिला मात्र कपिल मुनींनी तो घेतला नाही म्हणूनच गणेशाने चिंतामणी नाव धारण केले व ज्या कदंब वृक्षाखाली ही घटना घडली तेथेच तो तेव्हापासून तर आजपर्यंत वास्तव्य करतो अशी कथा आहे. हळूहळू या वृक्षाभोवती एक गाव वसलं. त्याचं नाव कदंब नगर ठेवण्यात आलं जे पूर्वी कदंबतीर्थ म्हणून प्रसिद्ध होतं. हे कदंबतीर्थ म्हणजेच आजचे थेऊर !

या गावाचे नाव थेऊर असण्यामागेही एक रोचक कथा दडली आहे. ब्रह्मदेवाने चंचल मनाला स्थिरता लाभावी म्हणून विनायकाचं चिंतन केलं ज्यामुळे ब्रह्मदेवाच्या मनाची चंचल वृत्ती नाहीशी झाली. ही सिद्धी ब्रह्मदेवाला ज्या ठिकाणी मिळाली त्याला त्यांनी स्थावर क्षेत्र नाव दिले व तिथे चिंतामणी गणेशाची स्थापना केली. पुढे या ठिकाणाला थेऊर हे नाव प्राप्त झाले. थेऊर हा स्थावरचा अपभ्रंश ! अहिल्येचे अपहरण केल्यामुळे गौतमाने इंद्राला शाप दिला होता त्यामुळे तो कुरूप झाला होता. गौतमाच्याच आदेशाने इंद्राने गणेशाची आराधना केली व तो शापमुक्त झाला. त्याचे शरीर पूर्वी प्रमाणेच सतेज झाले. इंद्राने ज्या ठिकाणी बसून विनायकाची आराधना केली तिथे त्याने श्रीगणेशाची स्थापना केली व तेथील सरोवरास ‘चिंतामणी’ असे नाव दिले. तेच हे आजचे थेऊर झाले.

चिंतामणी संदर्भात अशा अनेक पौराणिक गोष्टी इतिहासात नमूद आहेत. अष्टविनायकांपैकी थेऊरचा श्री चिंतामणी हा दुसरा गणपती आहे. थेऊरच्या कदंब वृक्षाखाली हे श्री गणेशाचे ठिकाण आहे. भक्तजनांची चिंता दूर करणारा म्हणून चिंतामणी असं बाप्पाला नाव देण्यात आलं. पुण्याचे पेशवे घराणे म्हणजे थेऊरच्या चिंतामणीचे मोठे भक्त. ते कायम चिंतामणीच्या दर्शनाला थेऊरला यायचे. थेऊरचा विस्तार हा माधवराव पेशवे यांनी केला. माधवराव पेशव्यांचे निधन थेऊरलाच झाले. ज्यावेळी त्यांचा मृत्यू झाला तेव्हा सती गेलेल्या रमाबाई यांची समाधी देखील या ठिकाणी आहे.

पूर्वी पुणे नजिकच्या चिंचवड येथील मोरया गोसावी यांनी या ठिकाणी चिंतामणीची उपासना करून सिद्धी प्राप्त केली अशा कथा आहेत. थेऊर येथील मंदिर मात्र मोरया गोसावी यांचा मुलगा चिंतामणी देव यांनी बांधले. या मंदिरातील गणेश मूर्तीला डाव्या बाजूला सोंड आहे. उत्तरमुख मंदिरात पूर्वाभिमुख चिंतामणीची मूर्ती आहे. प्रशस्त मंदिराला मोठा सभामंडप आहे. मंदिराच्या दोन बाजूंनी मुळा मुठा नदीचा वेढा आहे. अशा सुंदर वातावरणात असलेलं हे मंदिर कित्येक वर्षां पासून भक्तांच्या चिंता आणि दुःखाचा संहार करत आहे.

थेऊरला जाणे तुम्हाला अगदी सोपे आहे. पुण्या पासून ३० कि. मी. अंतरावर, पुणे-सोलापूर महामार्गाला जोडलेल्या रस्त्यावर थेऊर वसलेलं आहे. पुण्याहून थेऊरला जाण्यासाठी हमखास सर्व सुखसोयी उपलब्ध आहेत. आत तुम्ही चिंता करू नका, थेऊरच्या चिंतामणीला जाऊन एकदा बाप्पाचं दर्शन नक्की घ्या.