
गेल्या काही दिवसांपासून आपण कोरोना व्हायरस बद्दल ऐकतच आहोत. चीनमधून पसरलेल्या या भयानक व्हायरसमुळे भारतात तसेच जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या व्हायरसचा प्रसार होऊ नये म्हणून चीनमधील अंतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यामुळे चीनमध्ये शिकत असलेले जवळपास ३२४ भारतीय विद्यार्थी चीनमध्ये अडकले होते. हे विद्यार्थी आज भारतात सुखरूप परतले आहेत अशी माहिती मिळत आहे.
लोकमतच्या रिपोर्टनुसार या विद्यार्थ्यांना भारतात आणण्यासाठी एअर इंडियाच्या एका विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली होती. चीनमधील वुहान येथून निघालेले हे विमान आज सकाळी ७ च्या सुमारास दिल्लीत पोहचले. या विमानात दिल्लीतील राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमधील ५ डॉक्टर्स व पॅरा मेडिकल स्टाफ उपस्थित होते. या विद्यार्थ्यांसाठी औषधे, पाकिटबंद जेवण, मास्क या सर्वांची व्यवस्था देखील करण्यात आली होती. या विद्यार्थ्यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु ते मायदेशी सुखरूप परतल्याच्या बातमीने लोक सुखावले आहेत.