
मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान सणाला आजपासून जगभरात सुरुवात झाली. कोरोनाच्या संकटामुळे जगभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मशीदीही बंद ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, पाकिस्तान आणि इंडोनेशियामध्ये लॉकडाऊनचा फज्जा उडाला असून मशीदींमध्ये सुध्दा नमाज पठणासाठी गर्दी उसळली आहे.
रमजान काळात कोरोना व्हायरस पसरण्याचा प्रचंड मोठा धोका आहे. यामुळे इफ्तार पार्टी आयोजित न करण्याच्या निर्णय अनेकांनी घेतला आहे. मलेशिया, पाकिस्तान, बांग्लादेशमध्ये आरोग्य संघटनांनी सभा आणि रमजानचे काही विधींवर बंदी आणण्याची मागणी केली आहे.
इंडोनेशियामधील गृहीणी फितरिया फमेला यांनी सांगितले की, रमजान खूप वेगळा आहे. हा उत्सव नाहीय. मशीदींमध्ये न जाता आल्याने नाराजी आहे. पण काय करू शकतो? सध्या जग बदललेले आहे. मौलाना मोहम्मद शुकरी यांनी सांगितले की, आयुष्यात पहिल्यांदाच रमजानच्या पहिल्या दिवशी मशीदीत जाऊ शकलो नसल्याचे म्हटले आहे. मात्र, कोरोना थोपविण्यासाठी नियामांचे पालन करणे गरजेचे आहे.इंडोनेशियामध्ये कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. कारण रमजान काळात लाखो लोक गावी जातात. या शक्यतेमुळे राष्ट्रपती जोको विडोडो यांनी या प्रवासावर बंदी आणावी लागली आहे. याशिवायही लोक गावी जाण्याचा प्रयत्न करत आहेत. हा २६ कोटी लोकसंख्या असलेला देश आहे.