
प्राइम नेटवर्क : आता तुम्ही म्हणाल आजकाल हे काय भलतच ऐकायला मिळतय ? मंडळी, अक्षय कुमारचा “गब्बर इज बॅक” हा चित्रपट आठवला का ? ज्यात मृत व्यक्तीला जगवण्यासाठी थोडक्यात पैसे काढण्यासाठी डॉक्टरांचे एक वेगळे रूप आपल्यासमोर दाखवले गेलेय. हे जरी काही अंशी खरे असले तरी देवाचा पृथ्वीवरचा अवतार म्हणजे डॉक्टर असे आपण मानतो. तेच गंभीर रूग्णाला मृत्युच्या दाढेतून काढतील असा आपला दृढ विश्वासही असतो. पण कधीकधी तेही हतबल असतात. त्यांच्या प्रयत्नांना कायम यश मिळेलच असे नाही,त्यात आणखीच अवघड गोष्ट म्हणजे नातेवाईकांना मृत्युची खबर देणे.
ही बातमी आहे, डॉ. लुईस प्रोफेटा या अवलिया डॉक्टरची. तरुण व्यक्ति जर मृत झाली तर त्या व्यक्तीला त्याच्या फेसबूक अकाऊंटवरून जाणून घ्यायचा ते प्रयत्न करतात. सेंट व्हिंसेट हॉस्पिटल – इंडियाना पुलीस मधील हे डॉ. एका ट्विट मध्ये एखाद्या मृत तरुण/तरुणीशी संवाद साधल्याप्रमाणे लिहितात,
“तू जरी या जगात नसलास तरी तुझी ही बातमी तुझ्या घरच्यांना सांगण्यापूर्वी मी तुझे फेसबूक प्रोफाइल पाहीन,त्यामुळे मला जाणवेल की तू किती मजेत आयुष्य जगलास. तू मित्र-मंडळी,नातेवाईकांसोबत साजरे केलेल्या दिवसांचे फोटो बघून मला अंदाज येईल की मला कोणाला तुझ्या मृत्युची खबर द्यायची आहे;आणि त्यानंतर जे होणार ते बघायला तू नाहीस हेच नशीब. कारण हे हृदय पिळवटून टाकणारे रडणे,ओरडणे बघण खूप अवघड असत. अजून ५ मिनिटांनी ते पूर्वीसारखे नसतील,कारण ते तुझा फक्त हाडामांसाचा निर्जीव देह बघतील.”
डॉ. चे हे ट्विट नक्कीच हृदय हेलावणारे आहे. माणुसकीच्या नात्याने आणि प्रेमाचा ओलावा ठेवून इतकी अवघड बातमी देण्यासाठी उचलेले पाऊल खूप विलक्षण आहे. त्या मृत जीवाला प्रेमाने आदरांजली वाहून शेवटचा निरोप अत्यंत सुंदरतेने देण्याच्या या अवलिया डॉक्टरच्या पद्धतीला मानाचा मुजरा.