
जवळपास ४ महिन्यांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे कित्येक कामगारांना वेतन मिळाले नाही. राज्यांतर्गत बस वाहतूकही तेव्हापासून बंद असल्याने बस कर्मचाऱ्यांचे पगार रखडलेले होते. जवळपास १८ हजार बसेस डेपोमध्ये पडून आहेत. या चार महिन्यांत एसटी महामंडळाचा अडीच हजार कोटींचा तोटा झाला आहे. महाराष्ट्र टाइम्सच्या मीडिया न्यूजनुसार जिल्हांतर्गत वाहतूक सुरू झाली असली तरी प्रवासी संख्या कमी केली असल्याने डिझेलइतका पैसाही मिळत नाहीये. त्यामुळे बस कर्मचाऱ्यांना मार्च महिन्यात २५% तर मे महिन्यात ५०% कपात करून पगार देण्यात आला. तसेच जून महिन्याचा पगार अजूनही कर्मचाऱ्यांना मिळाला नाही.
अशा सर्व परिस्थितीत एसटीच्या लाखो कर्मचाऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार राज्य सरकारने त्यांच्या पगारासाठी ५५० कोटी रुपयांचे अनुदान देण्याचे मंजूर केले आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार व परिवहन मंत्री अनिल परब यांच्यातील बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
पगार मिळत नसल्याने सांगलीतील एका बस कर्मचाऱ्याने आत्महत्या केली होती. तसेच कर्मचाऱ्यांनी याबद्दल आवाज उठवायला सुरुवात केली होती. त्यामुळे शेवटी सरकारने यावर विचार करून ५५० कोटींचे अनुदान मंजूर केले आहे.