
सोमवारी १२ ऑक्टोबरला मुंबईत एकाच वेळी अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडित झाला. मेजर पावर ग्रीड फेल्युअरमुळे मुंबईतील सर्व व्यवहार ठप्प झाले. इंटरनेट, रेल्वे, ऑफिसमधील कामे सर्वकाही जागच्या जागी थांबले. याशिवाय मीडिया न्यूजनुसार सीईटी परिक्षेवरही याचा परिणाम पाहायला मिळाला.
अभियांत्रिकी प्रवेशाची ही परीक्षा १२ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबरच्या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात होणार होती. मात्र पावर कटमुळे मुंबईतील ठाकूर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, ठाकूर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, ठाकूर स्टडी अँड रिसर्च सेंटर, बाबासाहेब गावडे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, डॉन बोस्को सेंटर फॉर लर्निंग या ५ सेंटर्सवर परीक्षेदरम्यान व्यत्यय आला. याशिवाय पावर कटमुळे ट्रेन्स बंद झाल्याने विद्यार्थी वेळेत सेंटरवर पोहचू शकले नाही. त्यामुळे सीईटी सेलने याची दखल घेऊन १२ ऑक्टोबरला परीक्षा न देऊ शकलेल्या विद्यार्थ्यांना २० ऑक्टोबरला किंवा त्याआधी परिक्षा देता येईल असे सांगणारी नोटीस काढली. वरील सेंटर्स असणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही त्यांनी mhtcet2020.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर आपले अकाउंट लॉगिन करून परीक्षेची नवी तारीख पहावी.