
येत्या ११ ऑक्टोबरला राज्य सेवा परीक्षा होणार होती. मात्र मराठा आरक्षणाला न्यायालयाने स्थगिती दिली असल्याने बरेच लोक परीक्षा ढकलण्याची मागणी करत होते. यावर आज अंतिम निर्णय घेण्यात आला असून अखेर एमपीएससी परीक्षा पुन्हा एकदा पुढे ढकलल्या गेल्या आहेत. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन हा निर्णय घेतला गेला आहे. तरी परीक्षेची अंतिम तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
मराठा नेत्यांकडून कित्येक दिवसांपासून होत असलेली ही मागणी पूर्ण केल्याबद्दल या निर्णयाचे स्वागत करत खासदार संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्यांचे अभिवादन केले. परंतु ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी परीक्षा पुढे ढकलण्यास विरोध दर्शविला. बऱ्याच वेळा परीक्षा पुढे ढकलली गेली असल्याने विद्यार्थ्यांचे वय वाढत चालले आहे हा मुद्दा सरकारने लक्षात घ्यावा असे छगन भुजबळ म्हणाले.