Home महाराष्ट्र पुणे पिंपरीत क्वारंटाईन सेन्टरमधील जेवणात अळ्या, नागरीकांच्या जीवाशी खेळ

पिंपरीत क्वारंटाईन सेन्टरमधील जेवणात अळ्या, नागरीकांच्या जीवाशी खेळ

0

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या “इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन सेंटर’मध्ये नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. मोशीतील मागासवर्गीय वसतीगृहाच्या जेवण आणि नाष्ट्यात चक्क अळ्या सापडल्या आहेत, तर आकुर्डीतील खासगी महाविद्यालयात लहान मुलांना वेळेवर दूध मिळत नाही. नागरिकांच्या जेवणाच्या वेळा पाळल्या जात नाहीत. दुपारचे जेवण दुपारी साडेतीननंतर तर, रात्रीचे जेवण अकरानंतर मिळत आहे, यावरून प्रशासनाचा नियोजनशून्य कारभार समोर आला आहे. या तक्रारीची दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने मोशीतील अन्न पुरवठादारावर दंडात्मक कारवाई करून नोटिस बजावली आहे.

महापालिकेतर्फे मोशी, आकुर्डी येथे इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन सेंटर सुरू केले आहे.या सेंटरमध्ये वाकड, आनंदनगर, भाटनगर आदी भागातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेले, संशयित आणि कोरोनाची प्राथमिक लक्षणे असलेल्या नागरिकांना क्वांरटाईन केले आहे. सध्या या मोशीतील समाज कल्याण विभागाचे मागासवर्गीय वसतिगृह आणि आकुर्डीतील खासगी महाविद्यालय या सेंटरमध्ये 363 नागरिकांना ठेवण्यात आले आहे. मात्र येथे नागरिकांच्या आरोग्याची कोणतीही काळजी घेतली जात नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सेंटरमध्ये नागरिकांना सकाळचा नाश्‍ता, दोन वेळचे जेवण व पाणी देण्यासाठी महापालिका एका व्यक्तीमागे 450 रुपये खर्च करीत आहे. मात्र, त्याचा दर्जा सुमार आहे.

नागरिकांची तक्रार प्राप्त झाल्यावर तपासणीत संबंधित अन्न पुरवठादार दोषी आढळले आहेत. संबंधितांकडे अन्न परवाना नाही, तरीही महापालिकेने काम दिले आहे. त्यांच्यावर अकरा हजार रूपयाची दंडात्मक कारवाई केली असून नोटीस बजावली आहे. इतर सेंटरचीदेखील तपासणी करण्यात येणार आहे असे तेथील अधिकाऱ्यांनी सांगितले.