Home महाराष्ट्र पुणे आज मध्यरात्रीपासून पिंपरी चिंचवडमध्ये कडकडीत बंद, वाचा काय सुरू राहणार आणि काय...

आज मध्यरात्रीपासून पिंपरी चिंचवडमध्ये कडकडीत बंद, वाचा काय सुरू राहणार आणि काय बंद

0

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी कडक लॉकडाऊन साठी सूचना दिली होती पण हे लॉकडाऊन कसे असेल याचे स्वरूप स्पष्ट नव्हते. पिंपरी महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी या संबंधी आदेश आणि नियमावली काल रात्री उशिरा जाहीर केली आहे. सदर लॉकडाऊनची अमंलबजावणी करणे हे प्रशासनाला बंधनकारक करण्यात आले असून, दिनांक १४ जुलै म्हणजेच आज मध्यरात्री १२ वाजे पासून सदर नियम लागू होतील.

यांना घराबाहेर पडण्यास संपूर्ण निर्बंध:

६५ वर्षे व त्यापेक्षा जास्त वयोगटातील व्यक्ती, मधुमेह किंवा रक्तदाबाचे आजार असणारे व्यक्ती, दम्याचा त्रास असणारे व्यक्ती, श्वसनसंबंधी आजार असणारे व्यक्ती

काय असणार कडकडीत बंद?

(१) गल्लीबोळात असलेली किरकोळ किराणा मालाची दुकाने, धान्याचे दुकाने, तसेच इतर सेवा देणारी दुकाने ही पहिले पाच दिवस कडकडीत बंद असतील व त्यानंतर सकाळी ८ ते १२ या वेळात सुरू राहतील.

(२) सर्व सार्वजनिक ठिकाणे जसे मार्केट, मॉल, भाजीपाला दुकाने, उपहारगृहे, बार, लॉज, हॉटेल्स, सिनेमागृहे, उद्याने ही पहिली पाच दिवस कडकडीत बंद राहणार असून नंतरच्या काळात सकाळी ८ ते १२ दरम्यान सुरू राहू शकतात.

(३) केश कर्तन व्यवसाय, ब्युटी पार्लर, फळविक्री करणारे फेरीवाले यांना पहिले पाच दिवस संपूर्ण मनाई असून त्यानंतर सकाळी ८ ते १२ या वेळेत त्यांना व्यवसाय करता येईल.

(४) शैक्षणिक संस्था आणि संबंधित कार्यालये हे संपूर्ण बंद राहणार आहेत. शहरात दळणवळण साधन म्हणून दुचाकी किंवा चारचाकी वाहनांचा वापर करता येणार नाही, खासगी बसेस तसेच महापालिका बसेस आणि इतर सार्वजनिक वाहने याना संपूर्णपणे बंदी असणार. अत्यावश्यक आणि वैद्यकीय सेवा देणाऱ्या वाहतूकीवर हा नियम लागू होणार नाही.

(५) बांधकाम उद्योगातील सर्व कामे पूर्णपणे बंद राहणार असून त्यासाठी वापरली जाणारी सर्व वाहने यांना वाहतुकीसाठी मनाई करण्यात येत आहे.

या कडक नियमांखेरीज आयुक्तांनि काही नियम आणि अटीशर्थींसह महापालिका क्षेत्रातील काही व्यवसायांना परवानगी दिली आहे यामध्ये


(१) महापालिका क्षेत्रातील सर्व उद्योग सुरू राहतील मात्र मजूर व कामगारांची वाहतूक करण्यासाठी नेमून दिलेल्या वाहनांचाच वापर करता येणार आहे.

(२) वर्तमानपत्र कार्यालय आणि त्यांची छपाई कार्यालये ही पूर्णपणे सुरू राहणार असून त्यांची वितरण व्यवस्था वापरत असलेली वाहने यांना वाहतूक करण्यास मुभा आहे.

(३) पेट्रोल पंप सुविधा सुरू राहणार असून ह्यामध्ये फक्त शासकीय वाहने, अत्यावश्यक सेवा देणारी वाहने आणि वितरण व्यवस्थेतील वाहने यांनाच इंधन भरण्याची मुभा असणार आहे.

(४) बँकेच्या सर्व सुविधा यामध्ये ATM, ऑनलाइन बँकिंग यांना मुभा असणार आहे, याखेरीज न्यायालये सुद्धा सुरू राहतील.

(५) कृषी विषयक उत्पादन करणारे उद्योग तसेच कृषी प्रक्रिया उद्योग यांना परवानगी असणार आहे.

(६) स्थानिक स्वराज्य संस्थांना १०% कर्मचारी संख्येवर कार्यालये सुरू ठेवता येणार आहेत.

(७) बांधकाम क्षेत्रात फक्त मेट्रो आणि स्मार्ट सिटीची सर्व बांधकामे करता येणार आहेत.

या आदेशामध्ये उद्योगांना महत्वाची गोष्ट सांगण्यात आले आहे ती म्हणजे ज्या कंपनी वा उद्योगात कोरोना रुग्ण आढळला तिथे तेथील सर्व कर्मचाऱ्यांची कोरोनाचाचणी करणे हे कंपनीला स्वखर्चातून करणे बंधनकारक असणार आहे.