
“कोरोना संकट हाताळण्यास महाराष्ट्र सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने उत्तर प्रदेश आणि कर्नाटकमधील भाजपा सरकारकडून योग्य प्रेरणा घ्यावी”, अशा शब्दांमध्ये संरक्षणमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह यांनी निशाणा साधला होता.
“तसेच महाराष्ट्रात सरकारच्या नावाखाली सर्कस चा खेळ सुरु आहे”, अशी टीका देखील राजनाथ सिंह यांनी केली होती.
या टीकेनंतर ठाकरे सरकार मधील मंडळींनी राजनाथ सिंह यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे.मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांनी राजनाथ सिंह यांच्या टीकेवर प्रत्युत्तर दिले आहे.
नवाब मलिक ट्विट करत म्हणाले की, “महाराष्ट्रात लोकशाही पद्धतीने चालणारे सरकार चांगले काम करत आहे. कोरोनाबाबत मुंबई मॉडेलचे आयसीएमआरने देखील (भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद) कौतुक केले आहे.महाराष्ट्रात लोकशाही पद्धतीनं निवडून आलेलं सरकार आहे. हे सरकार उत्तम काम करतंय. लोकशाही मार्गानं चालणाऱ्या या सरकारला रिंगमास्टरच्या हंटरवर चालणारे मंत्री सर्कस म्हणत आहेत. हे त्यांचे अनुभवाचे बोल आहेत”, असा टोला देखील नवाब मलिक यांनी राजनाथ सिंह यांना लगावला आहे.
दरम्यान, राजनाथ सिंह यांनी सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महाराष्ट्राला ‘जनसंवाद रॅलीत’ मार्गदर्शन केले. यावेळी महाराष्ट्र सरकार हे संकट हाताळण्यास असमर्थ ठरले आहे, हे राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीने हे दाखवून दिले आहे, असं राजनाथ सिंह म्हणाले होते.