
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सुरू असलेल्या लॉकडाऊनचा अनेक उद्योगधंद्यांवर तसेच जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे. अर्थव्यवस्था मंदावली असून सर्वच क्षेत्रातील लोकांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे. अशातच राज्य सरकारने एक दिलासादायक निर्णय जाहीर केला आहे. स्थावर मालमत्ता खरेदी करण्यासाठी लागणाऱ्या मुद्रांक शुल्कात सरकारने सूट दिली आहे. यामुळे स्थावर मालमत्ता खरेदी आता स्वस्त झाली आहे.
महाराष्ट्राच्या महसूल विभागाने घेतलेल्या या निर्णयानुसार दुकान, प्लॉट, सदनिका, शेतजमीन, इत्यादींच्या खरेदीखत तसेच विक्री करारपत्राच्या कागदपत्रांवरील मुद्रांक शुल्कात यापुढे सूट देण्यात येणार आहे. त्यामुळे ३१ डिसेंबर २०२० पर्यंत मालमत्ता खरेदीसाठी ६ टक्क्यांऐवजी ३% व ५ टक्क्यांऐवजी २% शुल्क आकारले जाणार आहे. तर १ जानेवारी २०२१ पासून या कमी केलेल्या शुल्कात १ टक्क्याने वाढ केली जाणार आहे. म्हणजे ३ टक्क्यांऐवजी ४ % व २ टक्क्यांऐवजी ३% शुल्क १ जानेवारीपासून आकारले जाईल.