
देशातील विद्यापीठ व महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाची परीक्षा काहिकेल्या होणार असल्याचे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी सांगितले आहे. अंतिम वर्ष अथवा सत्राच्या परीक्षेवरून केंद्र सरकारने स्पष्ट भूमिका मांडली आहे. यावर राज्य सरकारकडून काय निर्णय घेण्यात येणार, याकडे लाखो विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.
नॅशनल असेसमेंट ऍण्ड ऍक्रिडिएशन कौन्सिल, बंगलोर (नॅक) ह्या संस्थेने करोनानंतर उच्च शिक्षणातील आव्हाने आणि संधी या विषयावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात मंत्री बोलत होते. पोखरियाल यांनी ऑनलाईनच्या माध्यमातून देशातील सर्व विद्यापीठाचे कुलगुरू, अधिष्ठाता, प्राध्यापक, प्राचार्यांची संवाद साधला. यावेळी त्यांनी उच्च शिक्षणासंदर्भात आढावा घेत करोनानंतर शिक्षणात आमूलाग्र बदल करण्याचे सूचित केले.
दरम्यान महाराष्ट्रात राज्यातील विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेवरून राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यात निर्माण झालेल्या मतभेदाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शनिवारी राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरुंशी चर्चा करणार आहेत.
कोरोनाच्या संकटामुळे विद्यापीठांच्या अंतिम वर्षाची परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना श्रेणी देऊन पदवी प्रदान करण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती राज्य सरकारने विद्यापीठ अनुदान आयोगाकडे केली होती. असे पत्र लिहिल्यानंतर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी त्याची दखल घेऊन उच्च शिक्षणमंत्र्यांनी अशा बाबतीत ढवळाढवळ करू नये. अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्या, असे मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कळवले होते.
विद्यार्थी मात्र जर परीक्षा रद्द झाल्या तर राज्यातील विद्यापीठांनी गुणपत्रिकांवर ‘एक्झमटेड’ किंवा ‘प्रमोटेड’ अशा कोणत्याही शेर्याचा उल्लेख करू नये. त्यामुळे विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासोबतच रोजगाराची संधी उपलब्ध होण्यास अडचण येऊ शकते अशी मागणी करत आहेत. यावर उपाय म्हणून गुणपत्रिकेवर ग्रेड किंवा टक्केवारीचा उल्लेख करावा. याचा विद्यार्थ्यांना रोजगार मिळवण्यासाठी फायदा होईल.