
पुणे येथील एका पूल उद्गाठण प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, “आज लॉकडाऊनबद्दल भारत सरकार काय निर्णय घेतंय हे पंतप्रधान नरेंद्र मोदी जाहीर करतीलच. पण माझ्या अंदाजाने वेगवेगळ्या राज्यांवर ते जबाबदारी देण्याची शक्यता आहे. कारण गेल्या अडीच महिन्यापासून सर्व कामकाज ठप्प आहे. यामुळे आर्थिक संकट उभे राहिले आहे. यावर आपल्याला मार्ग काढायचा आहे. यासाठी राज्य सरकार लवकरच पॅकेज देणार आहे. यासाठी मंत्रिमंडळाची बैठक पार पडेल. केंद्राकडून २१ लाख कोटींचे पॅकेज देण्यात आले, पण प्रत्येक राज्यातील जनतेच्या हातात प्रत्यक्षात किती मदत येणार याबाबत अनेक मतप्रवाह आहेत. काही म्हणतात हे नुसते मोठे आकडे पहायला मिळाले. गरीब जनतेलाही मदत मिळायला हवी, त्यासाठी आम्ही केंद्राकडे पाठपुरावा करतोय”
यानंतर ते म्हणाले, “सध्या संपूर्ण राज्य करोना विरोधात लढाई लढत आहे. या लढाईला जनतेचा मोठा पाठिंबा मिळत असून सामूहिक शक्तीच्या जोरावर करोनाला आपण निश्चितच हरवू शकतो,” असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. यानंतर त्यांनी पुणे शहरातील करोना परिस्थितीचा आढावा घेतला. तसंच हळूहळू राज्यातीप परिस्थिती पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
“करोनामुळे घाबरून जाण्याचे काही एक कारण नाही. स्वत: काळजी घेतल्यास तसेच स्वच्छता राखून शासनाने ठरवून दिलेल्या नियमावलीचे पालन केल्यास आपण करोनावर मात करू शकतो”, असा आशावाद अजित दादांनी यावेळी व्यक्त केला.