
रेल्वे प्रवाश्यांसाठी मध्य रेल्वेने एक आनंदाची बातमी दिली आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथे मध्य रेल्वेने वातानुकूलित वेटिंग लाउंज सुरू केला आहे. या लाउंजमध्ये अनेक सुखसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवाश्यांना रेल्वेची वाट पाहण्यासाठी प्लॅटफॉर्मवर थांबण्याची गरज राहणार नाही व त्या वेळेत अनेक सुखसुविधा उपभोगता येतील.
या वेटिंग लाउंजचे नाव ‘नमहः वेटिंग लाउंज’ (Namah) असे ठेवण्यात आले आहे. या लाउंजमध्ये वेळ घालवण्यासाठी प्रवाश्यांना एका तासाचे केवळ १० रुपये शुल्क द्यावे लागणार आहे. लाउंजमध्ये प्रवेश करतेवेळी ५० रुपये ऍडव्हान्स म्हणून द्यावे लागतील व निघतांना ४० रुपये १ तासानंतर परत मिळतील. लोकमतच्या मीडिया न्यूजनुसार CSMT मेनलाईन स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर १४, १५, १६, १७, १८ ला जोडणाऱ्या कॉरिडॉमध्ये हा वेटिंग लाउंज आहे. या लाउंजमध्ये सोफा, डायनिंग टेबल, लायब्ररी, बाथरूम, चार्जिंग पॉईंट्स, कॅफे, तसेच इतरही अनेक सुखसुविधा असणार आहेत. याशिवाय प्रवाश्यांना ट्रेन्सची माहिती दिसण्यासाठी या वेटिंग लाउंजमध्ये एक एलईडी स्क्रीन लावण्यात आली आहे तसेच स्टेशन ऑपरेटरच्या घोषणा प्रवाश्यांना ऐकायला येण्यासाठी लाउंजमध्ये स्पीकर्स देखील बसवण्यात आले आहेत.