
देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळख असलेली मुंबई अक्षरश: कोरोना रोगाच्या विळख्यात सापडली आहे. गेल्या २४ तासांभरात शहरामध्ये २१८ रुग्णांची वाढ झाली असून १० जणांचा मृत्यू झाल्याने मुंबईसाठी ही धोक्याची घंटा समजली जात आहे. दिवसभरामध्ये मरण पावलेल्या १० मृतांपैकी ९ रुग्णांना दिर्घकालीन बळावलेले आजार होते असे महापालिकेने नमूद केले असले तरी मुंबईमध्ये कोरोनाचे रुग्ण वेळीच नियंत्रणात आले नाहीत तर लॉकडाऊन किती काळ लांबेल हे सांगणे अतिशय कठीण आहे.
देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. त्यामध्ये सुद्धा मुंबईतील रुग्णांची संख्या खूप मोठी आहे. मुंबईसाठी ही चिंतेची बाब आहे. आतापर्यंत कोरोनाने ६४ मुंबईकरांचा बळी घेतला असून शहरामधील रुग्णांचा एकूण आकडा ९९३ वर पोहोचला आहे.
शहर, उपनगरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. वरळी, प्रभादेवी आणि धारावी या तीन ठिकाणी सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत एकूण ६९ रुग्ण कोरोनामुक्त झाले ही मुंबईसाठी थोडीशी दिलासादायक बाब आहे.
शुक्रवारी कोरोनासदृश्य लक्षणे आढळलेले २९२ नवीन रुग्ण दाखल झालेले आहेत अशा रुग्णांची एकूण संख्या ४०३५ इतकी झाली आहे. मुंबईमधील शासकीय आणि खासगी प्रयोगशाळांमध्ये आतापर्यंत कोरोनाच्या १६००० चाचण्या करण्यात आल्या आहेत. मुंबईतील कोरोनाचे हॉट्सपॉट लक्षात घेत राज्य सरकार आणि मुंबई महापालिका प्रशासनाने शहरातील ४ विभाग अतिशय गंभीर म्हणून घोषित केले आहेत. यापैकी जी दक्षिणेकडे लोअर परेल आणि वरळीचा परिसर, ई वॉर्डमध्ये भायखळा, भायखळा फायरब्रिगेड आणि आसपासचा भाग, डी वॉर्डमध्ये नानाचौक ते मलबारहिल परिसर तर के वेस्ट वॉर्डात अंधेरी पश्चिमचा भाग यांचा समावेश आहे. हे चारही विभाग संपूर्णपणे सील करण्यात आले आहेत.