Home राष्ट्रीय आरोपी विकास दुबे चा एन्काऊंटर हा नकली, विरोधी पक्षाचा घणाघात

आरोपी विकास दुबे चा एन्काऊंटर हा नकली, विरोधी पक्षाचा घणाघात

0

उत्तर प्रदेश मध्ये ८ पोलिसांना जीवे मारणारा कुख्यात गुंड विकास दुबे याचा आज सकाळी एन्काऊंटर करण्यात आला. त्याला काल अटक केल्यानंतर आज सकाळी जेव्हा एका पोलीस वाहनाद्वारे दुबेला सुरक्षित स्थळी हलवणे सुरू होते तेव्हा पोलीस वाहनाला अपघात झाला आणि ह्या अपघातानंतर विकास दुबे हा पळून जाण्याचा प्रयत्नात होता, त्यादरम्यान पोलीस शिपायांशी त्याची चकमक होऊन तो त्यात गंभीर जखमी झाला, या नंतर त्याला इस्पितळात नेल्यावर त्यास मृत घोषित करण्यात आले आहे.

फिल्मी स्टोरी सारख्या असलेल्या या एन्काऊंटरने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी, “सरकारमधील नेते आणि बडे पोलीस अधिकारी हे विकास दुबेचे सहकारी असल्यामुळे ह्यांनी त्यांचा संबंध उघडकीस येऊ नये म्हणून हा एन्काऊंटर रचला आहे” असा दावा केला.

गेल्या आठवड्याभरापासून या कुख्यात आरोपीचा शोध घेणे सुरू होते, परवा त्याच्या कुटुंबातील काही सदस्यांची सुद्धा चकमकीत हत्या करण्यात आली. विकास दुबे हा काल उज्जैन मधील महाकाल मंदिरामध्ये दर्शन घेत असताना पकडण्यात आला होता, आज सकाळी Special task force च्या जवानांनी दुबे याला मध्य प्रदेशातून उत्तर प्रदेशमध्ये हलवत असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला आणि ही पोलीस जीप रस्त्यावर पलटली या दरम्यान दुबे याने पोलिसांचे हत्यार घेऊन पळ काढण्याचा प्रयत्न करत असताना त्याला ठार करण्यात आले आहे.

विकास दुबे हा उत्तर प्रदेश मध्ये अनेक वर्षांपासून गुन्हेगारी विश्वाचा मास्टरमाइंड म्हणून ओळखल्या जातो, त्याने त्याच्या हयातीत त्याच्या इलाख्यात कुठलीच निवडणूक होऊ दिली नाही तसेच सरकारी कर्मचारी अपहरणाची अनेक प्रकरणे त्याच्या नावावर आहेत, एवढ्या कुख्यात गुंड्याने उत्तर प्रदेश मध्ये हात पाय पसरवणे हे बिना राजकीय सहकार्याचे अशक्य आहे, त्यामुळे विरोधी पक्ष हा अधिकारी आणि नेते यांच्यावर सत्य लपवत असल्याचा आरोप करत आहेत.